पुस्तकं
घरात वाचनाचे अतोनात वेड. बाबा खुप सारे पुस्तक आणत. मग ते नाथ माधव असोत, बाबा कदम, रणजित देसाई, शिवाजी सावंत की नारायण धारप. त्यासोबतच अधून मधून बृहत् कथाकोष, हरिवंशपुरान, आदिपुरान ही असे.
विदर्भ मराठवाड्याच्या कुठल्याही खेड्यात पुस्तक मिळणे हे वाळवंटात पाणी मिळण्यासारखच (होत) आता परिस्थिती थोडी बदलेली.
त्यावेळी पुस्तके मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रवास.
त्यातही बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर असणारे बुक स्टँड. त्याशिवाय धार्मिक प्रवासामध्ये तिर्थस्थानी असणारे ग्रंथ विक्री भांडार. त्यात कारंजा, सोलापूर, कुंभोज बाहुबली इथली प्रकाशने आणि ग्रंथ विक्री भांडार अतिशय कमी किमतीत ग्रंथ उपलब्ध करून द्यायचे.
माझी वाचनाची सूरवात चांदोबा पासून झाली. चिखली, जालना, औरंगाबादच्या बस स्टँड वरील बुक स्टँड म्हणजे वाचन वेड्यांचे आवडीचे ठिकाण.
तिथल्या पिवळट प्रकाशात आकर्षक पद्धतीने मांडलेली मासिक, पेपर, पुस्तक आणि तिथून येणाऱ्या कोऱ्या पुस्तकांचा वास हा कितीही वेळा छाती भरून घेतला तरी मन भरत नसे. त्यातही घरून मिळालेले अथवा पाहुण्यांनी जाताना हातात कोंबलेले पैसे देऊन स्वतः चे पुस्तक घेणे त्याची मजा काही औरच.
त्या शाळकरी वयात किशोर मासिकाचा उल्लेख नाही केला तर चालणार नाही. वरूड सारख्या ठिकाणी पोस्टाने माझ्या नावावर येणारे ते पहिले मासिक होते. पुढे विज्ञान युगशीही ओळख झालेली. विज्ञानविषयक आकर्षण निर्माण करण्यात या मासिकाचा मोठाच वाटा...
दिवाळी अंका मध्ये मराठवाडा, आवाज, धनंजय इत्यादी म्हणजे मजाच असायची.
पुस्तकं आधी कोण वाचणार यावरून भावंडांशी झालेल्या झटापटी आठवल्या की आता हसू येत.
रेल्वे स्टेशन वरील पुस्तक स्टाल हा एक वेगळा प्रकार. एक तर तिथे कायमच लोखंडाचा वास असायचा. त्या स्टॉल ची उंचीही जास्त असायची. तिथे मुख्यत्वे हिंदी इंग्रजी मासिक आणि पुस्तक जास्त असायची. त्यात पॉकेट बुक्स हा प्रकार फार दिसायचा सुरेंद्र मोहन पाठक हे त्यातले स्टार लेखक. पुढे औरंगाबादला शिकायला गेल्यावर दादांकडे आणि त्यांच्या मित्रांकडे मोठी थप्पी दिसली आणि वाचली पण.
विमानतळावरील पुस्तकाची दुकान मात्र फार शिस्तीची विविध रंग योजना आणि लाइट्स अशी. त्यातही बिझनेस, motivational इत्यादी इंग्रजीतील.
वाचन संस्कार होताना शाळेच्या ग्रंथपालांची आणि ग्रंथालयाची मोठीच भूमिका असे.
मग ते गुजराती विद्यामंदिर, आदर्श विद्यालयाचे ग्रंथालय आणि तिथले प्रेमळ ग्रंथपाल.सर मॅडम असोत की नंतर कामगार कल्याण वाचनालय(चिखली) अथवा खडकेश्र्वर चे महानगरपालिकेचे वाचनालय अथवा बळवंत वाचनालय असो. इथले सर्वच कर्मचारी हे केवळ नोकरी म्हणून तेथे काम करत नव्हते.
चांगली पुस्तकं सुचवणे हे त्यांचे मुख्य काम असायचे. वीणा गवाणकर, निरंजन घाटे, अरुण साधू यांची ओळख तिथेच झालेली.
एकदा असाच गुरुनाथ नाईकां च्या कादंबरी ने वेड लावलं होत. दुपारी ४.०० वाजता खडकेश्र्वर चे वाचनालय सुरू व्हायचे ते संध्याकाळी ७.०० पर्यंत चालायचे. मी तिथे ३.५० लाच पोहचायचे. १दा एक पुस्तक बदलून घेतले कार्ड वर सही केली आणि तिथेच बसून वाचायला लागलो. बहुदा गुरुनाथ नाईकांचे मृत्युकडे नेणारे चुंबन हे कॅप्टन दिप यांच्या मालिकेतील.असावे. तर साधारण ६.५० पर्यंत ते वाचून संपले. मग मी ते परत करून दुसरे पुस्तक मागितले. तिथले कर्मचारी माझे कार्ड शोधू लागले ५-७ मिनिटे शोध झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की मी हे आजचं घेतलेले आहे. एकदम माझ्याकडे वळून म्हणाले अरे आधी सांगायचं ना की हे आज घेतलेले म्हणून. कारण त्या दिवशीचे कार्ड ठेवायची जागा वेगळी असे. दुसऱ्या दिवशी ती कार्ड वेगळ्या जागी ठेवली जायची.
तसेच दैनिक मराठवाड्याचे ग्रंथालय. डिप्लोमा ल असताना बऱ्याचदा रात्री १- १.३० वाजता यादव सरांची शिकवणी संपवून मी दादांना घ्यायला मराठवाडा मध्ये जायचो. त्यांची पान आणि संपादकीय यावर शेवटची नजर सुरू असायची. तिथेच बेतवेतील प्रतिबिंब सारखे पुस्तक वाचायला मिळालेले धूमसते बर्फ जगमोहन यांचे ने नवे भान दिलेले.
काळी जोगिन हे नारायण धारप यांचे पुस्तक थोड्या जुन्या अवस्थेतील गुलमंडी जवळील पुस्तकाच्या दुकानात मिळाले त्यानंतर बरेच दिवस त्या विषायीच्या चर्चा आणि वाचून रात्री वाटणारी भीती याच कौतुक चाललेलं. पुढे चेटकीण, स्वाहा, समर्थ कथा यांनी त्यात भराच घातलेली.
व्यावसायिक आयुष्यात प्रवेश केल्यावर the goal सारखे पुस्तक वाचायला मिळाले ज्याने सांगितले की work life balance हे महत्त्वाचे आहे. Theory of constraint अतिशय सोप्या भाषेत मांडलेली आहे. प्रत्येक अभियंत्याने ते वाचायलाच हवे.
आता अमेझॉन, बुक गंगा, कींडल इत्यादी फारच सोय झालेली. सॉफ्ट कॉपी वाचायची सवय छानच झालेली.
बाबा सांगायचे पुस्तक वाचले की आपण शहाणे होतो. कितपत जमले माहिती नाहीय.
इथले अनेक लेखक वाचक नवीन जुन्या पुस्तकाबद्दल लिहितात आणि मग कळत की आपण अजून जास्त वाचायला हवं.
मध्ये मोबाईलवर वाचून चष्मा लागला तेव्हा सौ. ने आयपॅड भेट दिला. (तो माझ्याऐवजी मुलगाच जास्त वापरतो 😊) अर्थात त्याचेही मत असच आहे की हार्ड कॉपी जास्त चांगली... कारण तेच नव्या शाईचा गंध...
मग एक दिवस हर्षल (मुलगा) म्हणतो अमुक एक पुस्तक पाहिजे जरा मागवता का. मी मनाशीच हसतो. अमेझॉन वर ऑर्डर पे करताना मी घरात नसतो तर एसटी स्टँड च्या बुक स्टाल वर मनाने पोहचतो बाबांच्या जागी. धूसर डोळ्यांनी दिसतो चांदोबा साठीचा हट्ट करणारा छोटा सचिन... एक वर्तुळ पूर्ण होत...
सचिन काळे ©️
#पुस्तकं