Wednesday, 22 January 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस

 लहान असताना गाव भर फिरायचो.
सर्व घर आपलीच. पण लपंडाव रंगायचा तो मात्र नानाच्या वाड्या समोरच्या गल्लीत. सर्व मित्र मंडळी गोळा करून साडे माडे तीन म्हटलं की शोध सुरू व्हायचा. 
माझी एक जागा ठरलेली असायची वाड्यातील सोप्यात पलंगाच्या मागं असलेले ज्वारी चे पोते आणि भिंत यांच्या मध्ये मी लपून बसायचो. तिथून समोरचा चौक उजवीकडची विहीर, धुण्याचा दगड, त्यानंतरचा मोठा दरवाजा आणि नंतर रस्ता सर्व छान बघता यायचं.
यासोबतच तीन चित्र जी सोप्याच्या भिंतीवर लावलेली होती. चांगली मोठी एक सारख्या आकाराची समोरचा काच पिवळी पडलेली बाजूच्या लाकडी फ्रेम धुराने अजुनच काळवंडलेली. तिन्ही तसबिरी मधील माणसे मात्र ओळखू यायची. 
एका बाजूला घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, दुसरी कडे भाला आणि दोन तलवारी म्यान असलेले महाराणा प्रताप. या दोघांच्या मध्ये एक अजून तसबीर त्यातला रुबाबदार माणूस खाकी वर्दी मधाला भेदक नजर तेजस्वी चेहरा, मला फार आवडायचा. नाव नेताजी सुभाष चंद्र बोस.
 
अनेकदा एकल्यावरही आजीला पुन्हा विचारायचो त्यांच्या बद्दल. तीही परत सर्व सांगायची अगदी त्यांना झालेल्या नजर कैदेपासून तर कसं आजारी असण्याच नाटक केलं आणि वेषांतर करून गोर्यांच्या डोळ्यात धूळ फेकून गाठलेले अफगाण नंतर जर्मनी आणि युरोप. पाणबुडी मधून जगाला घातलेली गवसणी आणि जपान भेट , तिथं ठरलेले बेत आणि मग सिंगापूर मधील सुवर्ण तुला तिथं एका आईने पारड्यात टाकलेली आपल्या शहीद झालेल्या एकुलत्या एक मुलाची तरस्विर आणि दोन्ही पारडी सम पातळीवर आलेली. इथ मला मात्र कृष्णाच्या आणि तुळशी पत्राच्या तुलना याची आठवण यायची. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा ची घोषणा...
 इतका वेळ गोष्ट सांगणारी आजी शांत व्हायची भरलेले डोळे पुसताना मलापण धूसरच दिसायची. पुढची गोष्ट बाबा सांगायचे कशी इंडियन नॅशनल आर्मी तयार झाली, उपाशी पोटी ब्रह्मदेशात घास खाऊन लढली शहीद आणि स्वराज बेट जिंकली. 
आणि नंतर देश भर असलेल्या सेनेने प्रतिसाद दिला, मुंबईला नौसैनिकानी केलेला उठाव आणि शेवटी मिळालेले स्वातंत्र्य. 
इथ मी विचारायचो नेताजींचे पुढं काय झालं. तोपर्यंत आजी मात्र हुंदके दाबून ठेवण्याच्या प्रयत्नात थरथरायची. जपान पराभूत झाल्यावर नेताजींच्या नाहीसे झाल्यावर इंडियन नॅशनल आर्मी ची झालेली पडझड त्यातच हरवलेला नाना आजोबा... 
आणि देवघरात समाईच्या उजेडात शांत बसलेली आजी तर फोटोमधून माझ्याकडे बघणारे आणि मंद मंद हसणारे नाना ... बघत बघत वाळलेले आसू घेऊन पेंगणारे डोळे बाबांच्या खांद्यावरून घराकडे जाताना दिसत राहायचे.

सचिन काळे ©️

No comments:

Post a Comment